अमरावती व बडनेरा ही दोन जुळी शहरे नागपूरहून 152 किमी आणि मुंबईहून 663 किमी अंतरावर आहेत. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेशमधील बैतुल जिल्हा, ईशान्येस नागपूर जिल्हा, पूर्वेस वर्धा जिल्हा, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा, नैऋत्येस वाशीम जिल्हा आणि पश्चिमेस अकोला व बुलढाणा जिल्हे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या शहरांना लागून जातो. अमरावती हे समुद्र सपाटीपासून 340 मीटर उंच आहे. अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक कापूस व सोयाबीन हे होय. अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे. या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती शहराला वडाळी तलाव व छत्री तलाव या दोन तलावांतून ब्रिटिशांच्या काळात पाणी पुरवठा व्हायचा.

अमरावतीचा इतिहास


अमरावती हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील एक महत्वाचे शहर. अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील इंद्रदेवाची नगरी ‘इंद्रपुरी’ असा होतो. या शहरात जुन्या काळी उंबराची झाडे खूप होती म्हणून या शहराला औदुंबरावती असे म्हणत, ते प्राकृतमध्ये उंबरावती झाले. नंतर ते उमरावती या नावाने प्रसिद्ध झाले. जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या इ.स.1097 मधील संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर ‘अमरावती’ या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो.
अमरावतीला विदर्भाची सांस्कृतिक राजधानी व शैक्षणिकदृष्ट्या शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. विदर्भामध्ये प्रशासनाच्या दृष्टीने दोन विभाग केले आहेत- नागपूर आणि अमरावती. त्यांपैकी अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. अमरावती शहर हे महाराष्ट्रातील दाट लोकवस्ती असलेल्या महानगर क्षेत्रांमध्ये सातव्या क्रमांकावर येते. हे शहर अमरावती जिल्ह्याचे व विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात ऐतिहासिक अशी अंबा व श्रीकृष्ण मंदिरे आहेत. इ.स.1983 मध्ये स्थापन झालेली अमरावती महानगरपालिका आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये या जिल्ह्याचे नाव खूपच अग्रेसर आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गुलाबराव महाराज, डॉ. शिवाजीराव पटवर्धन, डॉ. पंजाबराव देशमुख इत्यादी महत्त्वाच्या व्यक्ती या जिल्ह्यात होऊन गेल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी इ.स.1935 साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. अमरावती जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले चांदूरबाजार तहसिलातील माधान हे गाव श्री गुलाबराव महाराजांची कर्मभूमी आहे. इ.स.1946 साली डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाची स्थापना केली. इ.स.1897 चे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन अमरावती येथे भरले होते. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते. दादासाहेब खापर्डे यांचेकडे स्वामी विवेकानंदांच्या शिष्या भगिनी निवेदिता 3 दिवस मुक्कामाला होत्या.
अमरावती विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. अंबादेवी हे शहराचे मुख्य दैवत आहे. शहराच्या मध्यावर अंबापेठेत देवीचे पुरातन देऊळ आहे. रुक्मिणीने श्रीकृष्णाला याच मंदिरात बोलावले होते. येथे श्रीकृष्णाने देवीची पूजा करून रुक्मिणीसोबत लग्न करून तिचे हरण केले होते. मंदिराच्या जवळच एकवीरा देवीचे मंदिर आहे. त्या मंदिराच्या खाली योगाचार्य जनार्दन स्वामी यांची समाधी आहे. प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते.
देवगिरी शासकापासून मुघलांच्या शासनापर्यंत वेगवेगळ्या साम्राज्यांखाली अमरावतीचा विकास झाला आहे. मुघलांचे शासन इ.स.1707 साली औरंगजेबच्या मृत्यूनंतर संपुष्टात आले. याचबरोबर येथे मराठ्यांचा उदय झाला. इ.स.1772 साली छत्रपती शाहू महाराजांनी अमरावती आणि बडनेरा हा प्रदेश श्री राणोजी भोसले यांना बक्षीस दिला. यावेळी ह्या प्रदेशाच्या समृद्धीमुळे इथले लोक अमरावतीला भोसलेंची अमरावती म्हणून उल्लेख करीत असत. गाविलगडावर विजय मिळवून राणोजी यांनी प्रांताची पुनर्रचना आणि विकास केला. सद्याचे अमरावती शहर 18व्या शतकाच्या शेवटी अस्तित्वात आले. इ.स.1805 च्या साली पेंढारी लोकांनी येथे आक्रमण करून या भागाची फार लूट केली. त्यावेळी अमरावतीच्या सावकार व व्यापारी वर्गानी पेंढाऱ्यांना खूप मोठी रक्कम देऊन अमरावतीला त्यांच्या आक्रमणापासून वाचविले होते.
तेराव्या शतकात देवगिरीच्या हिंदू राजाच्या यादव घराण्याचे शासनाच्या काळात महानुभाव पंथाचे “श्री.गोविंद महाप्रभू” अमरावतीला आले होते. छत्रपती शाहू महाराजांनी दि.9 ऑक्टोबर 1722 रोजी वंश परंपरने राणोजी उर्फ सवाई संताजी भोसले यांना मौजे अमरावती परगणे बडनेरा हे गाव इनाम दिले. देवगाव व अंजनगाव सुर्जीचा तह आणि गाविलगड (चिखलदराचा किल्ला) यांच्या विजयानंतर शहराचे पुनर्रचना व विकास राणोजी भोसले यांनी केले. इ.स.1853 साली, वऱ्हाड प्रांताचा भाग असलेला अमरावती प्रदेश हैदराबादच्या निझाम आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. क्रूर निझाम पेक्षा कंपनीच्या अधिपत्याखाली अमरावतीचे लोक जास्त खुश होते. कंपनी प्रशासनाखाली आल्यानंतर हा प्रांत दोन जिल्ह्यात विभागण्यात आला. अमरावतीची तत्कालीन सीमा हा उत्तर वऱ्हाड जिल्हा म्हणून घोषित झाला (मुख्यालय-बुलढाणा). कालांतरे, हाच प्रदेश पूर्व वऱ्हाड जिल्ह्यात परिवर्तीत केला गेला (मुख्यालय-अमरावती). ब्रिटीश जनरल आणि लेखक वेलेस्ली यांनी अमरावतीत तळ ठोकला होता, अजूनही ते ठिकाण ‘कॅम्प’ म्हणून ओळखले जाते. इ.स.1852 ते 1871 या काळात ब्रिटीशांनी अनेक सरकारी इमारती बांधल्या. रेल्वे स्टेशन हे इ.स.1859 ला बांधल्या गेले. स्वातंत्र्यानंतर इ.स.1956 मधील राज्य पुनर्रचनेदरम्यान अमरावती जिल्ह्यासहित विदर्भातील सर्व जिल्हे तत्कालीन द्वैभाषिक मुंबई राज्यास जोडण्यात आले. 1960 मध्ये महाराष्ट्र व गुजरात वेगळे झाल्यावर अमरावती जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला. अमरावती जिल्हा हा पूर्णपणे दख्खनच्या पठारावर आहे. इ.स.1903 साली नवीन निर्माण झालेले सेंट्रल प्रोव्हिंस व वऱ्हाडचा हा भाग बनला. इ.स.1956 साली अमरावती जिल्हा बॉम्बे प्रांतात सामील झाला व 1960 राज्य पुनर्गठन वेळी महाराष्ट्राचा भाग बनला.

अमरावती शहरातील व जिल्ह्यातील धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळे


अमरावती जिल्ह्यातील पर्यटनामध्ये मंदिरे, नैसर्गिक झरे आणि सुंदर वन्यजीव, अभयारण्ये इत्यादींचा समावेश होतो.

अंबादेवी

हे महाराष्ट्रातील अनेक कुटूंबियांचे कुलदैवत आहे. भगवान श्रीकृष्णाने कौंडण्यपूरहून रुक्मिणीचे हरण करून अंबादेवी मंदिरात लग्न केले. नवरात्रीत 9 दिवस येथे मोठी यात्रा भरते. हे प्राचीन मंदिर 1000 वर्ष जुने आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका अंबादेवीला पाठविली होती. जुन्या वस्तीच्या परकोटाला लागून हे मंदिर आहे. अंबादेवीची मूर्ती अतिशय पुरातन आहे. हे मंदिर मुगलांनी उध्वस्त केले होते. इ.स.1660 च्यास सुमारास श्री.जनार्दन स्वामींनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्या बाई होळकर यांचेही या मंदिराच्याद उभारणीत मोलाचे योगदान आहे. विदर्भातील प्राचीन शहर अमरावती पौराणिक दृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. कौंडिण्यपूर येथील विदर्भात राज्य करणाऱ्या भीष्मक राजाने आपली कन्या रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी ठरविला होता, जो तिला मान्य नव्हता. तिने श्रीकृष्णाला आपली इच्छा कळवताच ते कौंडिण्यपूरला आले व त्यांनी रुख्मिणीचे हरण केले. अमरावतीला अंबादेवी मंदिरात त्या दोघांनी विवाह केल्याची अख्यायिका आहे. या अंबादेवी मंदिरात रुक्मिणीने देवीला साकडे घालून इच्छित वराचं दान मागितलं. प्रकटलेल्या अंबादेवीने रुक्मिणीला फुलांची माळा दिली. लग्नाला विरोध करणाऱ्या रुक्मिणीच्या भावाला पराजित करून श्रीकृष्ण तिला आपल्यासोबत द्वारकेला घेऊन गेले.

एकविरादेवी

अंबादेवी मंदिराच्या दक्षिण बाजूला एकविरा देवीचे प्रशस्त मंदिर आहे. एकविरेला मोठी देवी व अंबादेवीला लहानदेवी म्हणण्याचा फार पुरातन प्रघात आहे. इ.स.1499 साली अंबादेवी मंदिराजवळ बांधलेल्या एकविरादेवी मंदिराचा जीर्णोद्धार इ.स.1660 च्या सुमारास जनार्दन स्वामींनी केला. एकविरादेवी मंदिराचा भव्य सभामंडप आहे. मंदिरात कोरीव कलाकृती आहे. मंदिराच्या तळाशी जिथे जनार्दनस्वामी तपश्चर्या करायचे त्याच ठिकाणी त्यांची समाधी आहे. बाजूलाचे कौंडिण्यपूरपर्यंतचा भूयारी मार्ग आहे.s

जैन श्वेतांबर मंदिर

सराफा बाजारातील श्वेतांबर जैन मंदिर जवळपास 159 वर्षांपूर्वीचे आहे.


ऑक्सिजन पार्क

शहरात डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापरात असलेल्या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रुपांतर हे जैवविविधता संवर्धनाचे आदर्श उदाहरण आहे. जैवविविधता जोपासणारा हा ऑक्सिजन पार्क अमरावती शहरासाठी भूषण आहे. वनविभागाच्या माध्यमातून या रुक्ष जागेचे एका देखण्या उद्यानात रूपांतर झाले आहे. शहर सौंदर्यीकरण, प्रदूषण नियंत्रणाबरोबरच पर्यटकांसाठीही एक महत्वाचे आकर्षणस्थळ निर्माण झाले आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये वड, पिंपळ, निम व बिहाडा या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही झाडे उन्हाळ्यातही हरित राहून सावली, तसेच जास्तीत जास्त प्राणवायू देतात.ऑक्सिजन पार्कमध्ये बांबूचेही स्वतंत्र रोपवन तयार करण्यात आले असून, त्यातून जाणारी वाट व पूलाची निर्मिती करण्यात आली आहे.

वडाळी बांबू उद्यान

अमरावती येथील वडाळी भागात 49 एकरात उभारलेल्या या बांबू उद्यानात 63 प्रकारचे बांबू आहेत. हा महाराष्ट्रातील एक मोठा बांबू प्रकल्प आहे. बांबूची झोपडी, बांबूची गुफा, बांबूचा पुल, बांबू विषयक माहिती केन्द्र, निवडूंग व कमळाची बाग, नक्षत्र वन ही या उद्यानाची वैशिष्ठे आहेत. भारताच्या विभिन्न प्रांतातून बांबूच्या अनेक जाती येथे आणून त्यावर संशोधन केले जाते

मालटेकडी

अमरावती बसस्थानकाच्या बाजूला एका लहान टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे म्हणून याला शिव टेकडी देखील म्हणतात. तेथून अमरावती शहराचे मनोरम दृश्य पहावयास मिळते. लोक तेथे चालायला जातात.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ

इ.स.1914 मध्ये अल्प स्वरूपात स्थापन झालेली क्रिडा नैपुण्याची ही संस्था आज देश विदेशात प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा जलतरण तलाव, अनंत क्रिडा मंदिर, स्वर्गीय हरिभाऊ कलोती रंगमंच, विशाल स्टेडियम, कॉन्फरन्स हॉल ही येथील वैशिष्ठ्ये असून विविध राज्यांतून मुले-मुली शारीरिक शिक्षणासाठी येथे येतात. जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ह्या संस्थेची स्थापना 1914 साली थोर स्वातंत्र सेनानी वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेतून स्व.अंबादास वैद्य यांनी केली. भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलाढ्य युवकांची फळी निर्माण व्हावी ह्या उद्देशाने ही संस्था सुरू केली होती. मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे व भारतीय प्राचीन व्यायाम पद्धतीचा प्रसार व प्रचार करणे हा ह्या संस्थेचा मूळ उद्देश आहे. भारत मातेचे थोर सुपुत्र शहीद राजगुरूने या संस्थेत प्रशिक्षण घेतले होते. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महान नेत्यांनी ह्या संस्थेला भेटी दिल्या आहेत.

तपोवन विदर्भ महारोगी सेवा समिती अमरावती

ही संस्था श्री.शिवाजीराव पटवर्धन यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन कुष्टरोग्यांच्या सेवेसाठी इ.स.1950 साली स्थापन केली. ते शेवटपर्यंत स्वामीजीसारखी केशरी पगडी घालत असत.

माता खिडकी श्रीकृष्ण मंदिर

माता खिडकी भागात असलेले हे श्रीकृष्ण मंदिर महानुभाव पंथीयांसाठी महत्वाचे स्थान आहे.

कोंडेश्वराचे यादवकालीन शिवालय

हे कोंडेश्वरचे अतिप्राचीन मंदिर अमरावती-बडनेरा रोडवर अमरावतीहून 10 किमी अंतरावर जंगल प्रदेशात असल्याने येथील वातावरण नैसर्गिक व शांत आहे. जवळच टेकड्या व नव्याने बांधलेला एक तलाव आहे. अमरावतीच्या पूर्वेस पोहरा मालखेड चे जंगल आणि पहाडी भाग असून या जंगलाला लागून व शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या बायपास रोडवरून या मंदिराकडे जाता येते. कोंडेश्वरचे मंदिर हे एक प्राचीन व वैशिष्टपूर्ण असे महादेवाचे देवालय असून ह्या देवालयाची स्थापना साधारणता 5000 वर्षापूर्वी थेट भरत राजा याचे काळात व त्याचा बंधू राजा विदर्भ याने केल्याचे मानण्यात येते. प्रत्यक्षात या देवालयाचे बांधकाम किंवा जीर्णोद्धार 800 वर्षापूर्वी म्हणजेच तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव कुळातील राजा कृष्णदेवराय यांच्या काळात त्यांचा प्रधान व कुशल स्थापत्य तज्ञ हेमाद्रीपंत यांच्या देखरेखीत झालेला आहे. श्री.कौडण्यमुनींच्या नावावरून या मंदिराचे नाव कोंडेश्वर असे पडले.

तपोवनेश्वर शिव मंदिर

चांदुर रेल्वे रोडवर अमरावतीपासून 15 किमी अंतरावर हे तपोवनेश्वर शिव मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे स्थान आहे. त्रेतायुगात निर्माण झालेले तपोवनेश्वर हे जागृत शिव मंदिर होते. जेथे श्रृंगी ऋषी रोज पूजा करण्यासाठी येत असत. ते पुत्र कामेष्टि पूजेचे पुरोहित होते. राजा दशरथाने गुरू वशिष्ट यांच्या सल्यानुसार श्रृंगी ऋषीना पुत्र कामेष्टि यज्ञासाठी आमंत्रित केले होते. राजा दशरथांची आई महाराणी इंदुमती विदर्भातील कौण्डिन्यपूरच्या राजाची कन्या होती आणि त्यांचे गुरू श्रृंगी ऋषी होते. इंदुमतीच्या विनंतीवरून श्रृंगी ऋषी पुत्र कामेष्टि पूजा करण्यासाठी अयोध्येला गेले होते. तेव्हा पासून श्रृंगी ऋषींच्या नावाने हे ठिकाण नावारुपाला आले. पोहरा बंदी च्या तीन पहाडांमध्ये हे शिव मंदिर वसलेले असून जवळच गुफा आहे. तेथे जलकुंड पण आहे. या ठिकाणी श्रृंगी ऋषींच्या आश्रम होता.

मुक्तागिरी

मुक्तागिरी हे मध्यप्रदेशतील जैनधर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. हे अमरावतीपासून 65 किमी दूर आहे. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत 52 पांढरी शुभ्र संगमरवरी मंदिरे, धबधबा, गोमुखातून येणारे पाणी ही येथील वैशिष्ट्ये आहेत. डोंगरावर असलेल्या येथील मंदिरात जाण्यासाठी 600 पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो. मंदिरात तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. जैन धर्मीयांच्या 'अतिशय क्षेत्रांपैकी' हे एक आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यापासून 18 किमी अंतरावर मध्यप्रदेशच्या भैसदेही तालुक्यात निसर्गरम्य परिसराने नटलेले हे जैन तीर्थक्षेत्र आहे.

भातकुली

पेढी नदी काठी जैनांची काशी म्हणून हे तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. हे अमरावतीहून 18 किमी अंतरावर असून पूर्वी भोजकूट नावाने प्रसिद्ध होते. याची स्थापना भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणीचा भाऊ राजा रुक्मी याने केली. भगवान नेमिनाथ यांच्या धर्मोपदेशाने प्रभावी होऊन सर्व राज्य आणि पारिवारीक व्याप बाजूला सारून राजा रुक्मीने भातकुली पासून एका मैलावर भव्य चैत्यालयाची निर्मिती करून भगवान 1008 श्री आदिनाथ यांच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तिची प्रतिष्ठापना केली होती. पुढे मुघल काळात ही मूर्ती बचाव म्हणून एका किल्ल्यात पुरण्यात आली होती. अठराव्या शतकात या गावाच्या प्रमुखास एका रहस्यमय स्वप्नात या मूर्तिचे रहस्य उलगडले आणि त्या स्थळी उत्खनन केले असता आदिनाथ भगवंताची ती मूर्ती तेथे आढळून आली.

सालबर्डी

महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या उंच पहाडावर डोंगराच्या 25-30 फूट खोल गुहेत स्वयंभू महादेवाचे लिंग आहे ज्यावर पहाडातून सतत जलाभिषेक सुरू असतो. तसेच येथे एकमेकाला लागून गरम व थंड गंधकाचा वास येणार्या- पाण्याचे कुंड असून त्यात स्नान केल्यास त्वचा रोग बरे होतात असा समज आहे. हे पर्यटनस्थळ अमरावतीहून 65 किमी मोर्शीपासून 8 किमी अंतरावर आहे. येथे महादेवाचे जागृत ठिकाण आहे. येथील गरमपाण्याचे झरे, पांडव कचेरी लेण्या, संत मारुतीमहाराजांची समाधी आणि महानुभाव पंथाचे प्रसिद्ध मंदिर ही येथील काही ठळक आकर्षणे आहेत.

बहिरम

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर अमरावतीहून 66 किमी व अचलपूरहून 22 किमी वर बहिरम हे सातपुडा पर्वत रांगेत वसलेले आदिवासींचे कुलदैवत आहे. बहिरम बाबाला बोकड आणि कोंबडीचा नवस म्हणून बळी देण्याची प्रथा होती पण आता मंदिर परिसरात प्राण्यांची बळी देण्याची प्रथा संत गाडगेबाबांमुळे बंद करण्यात आली आहे. शंकराचे रुद्ररूप असलेले हे स्थान ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी महिनाभर यात्रा चालते जी डिसेंबर महिन्यात सुरू होते. हे सर्वधर्मसमभावाचा परिचय देणारे प्रसिद्ध बहिरम बाबाचे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 125 फूट उंचीवर आहे. चढण्यास 108 पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे.या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे.

शेणगाव संत गाडगेबाबांचे जन्मस्थान

गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी, अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे गाडगेबाबा हे कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. अमरावतीहून 68 किमी दर्यापूर तालुक्यातील शेणगाव हे त्यांचे जन्मस्थळ. त्यांनी दिनदुबळ्यांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. शाळेत कधीही न शिकलेल्या या पुण्यात्म्याचे नाव अमरावती विद्यापीठास (संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) देण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रभर बाबांच्या धर्मशाळा व स्मृती-स्मारके आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ दि.20 डिंसेंबर 1956 रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावतीमधील गाडगे नगर येथे आहे.

ऋणमोचन मुद्गलेश्वर शिव मंदिर

अमरावतीहून 18 किमी भातकुली तालुक्यात पूर्णा नदीच्या काठी वसलेले तीर्थक्षेत्र मुदगल ऋषिच्या तपश्चर्येतून आणि वैराग्यमूर्ती गाडगेबाबाच्या समाज कार्याच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेले तीर्थक्षेत्र होय. अंध अपंगांना अन्न, वस्त्र या मूलभूत सेवा देण्याचे कार्य संत गाडगेबाबांनी 110 वर्षांपूर्वी हाती घेतले. त्याची सुरूवात भातकुली तालुक्यातील ऋणमोचन येथील मुद्गलेश्वर मंदिरातून केली होती. संत गाडगे महाराजांच्या मामांच्या या गावात पूर्णा नदीकाठी मुद्गलेश्वर मंदिर आहे. या तीर्थक्षेत्री पयोष्णी (पूर्णा) नदी पूर्वाभिमुख व अर्धचंद्राकृती वाहत असल्याने या तीर्थक्षेत्राला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान शंकराचा (महादेव) दिवस सोमवार असला तरी, येथील मुद्गगलेश्वराचा दिवस मात्र पौष महिन्यातील रविवार असतो. शेकडो वर्षापासून येथे पौष महिन्यात मोठी यात्रा भरते. ती रथसप्तमीपर्यंत असते. पौष महिन्यातील रविवारी पूर्णा नदीत अंघोळ करुन ओल्या अंगाने अकरा तांब्याच्या गडव्याने मुद्गगलेश्वराचा जलाभिषेक व बेलपत्री वाहण्याची प्रथा आहे.

रिद्धपूर

अमरावतीहून 42 किमी वर श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभाव पंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी आहे. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले. मराठी सरिता जेथे उगम झाली ती हीच पावनभूमी आहे, मराठी वाङ्मयाची पंढरी आहे. ही माती श्री गोविंदप्रभू, श्री.चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांच्या वास्तवाने पुनित झालेली आहे. महीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांच्या प्रतिभेला याच मातीमध्ये अंकुर फुटला. समतेचा विचार १३ व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. श्री गोविंदप्रभू महाराष्ट्राचे आद्यकर्ते संत सुधारक होते. ते श्री चक्रधरांचे गुरू होते. श्री चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली तेही या रिद्धपूरच्या भूमितच. नागदेवाचार्यांनी लीळाचरित्र आद्यग्रंथ मराठी भाषेतच नव्हे, तर मराठीच्या वऱ्हाडी बोलीत लिहून घेतले व बोली भाषेला शास्त्रीय भाषेचे महत्त्व प्राप्त करून दिले. संस्कृत पंडितांना त्यांनी बोलीभाषेतून बोलते केले. वऱ्हाडी बोली आद्यग्रंथाची भाषा झाली. श्री चक्रधरांनी याच गावात वाङ्मयीन, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक क्रांती केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा देण्याचा पहिला प्रयत्न याच भूमित झाला. मराठी भाषेला त्यांनी याच भूमितून शास्त्रभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. ही फार मोठी वाङमयीन भाषिक क्रांती होती. महानुभावांच्या १४ सांकेतिक लिपी ही फार मोठी भाषा वैज्ञानिक व लिपीशास्त्राची क्रांती होय. ते अहिंसेचे आद्यप्रवर्तक होते. श्री चक्रधरांनी मराठी भाषा चर्चास्तंभ बनविली. लोकोद्धारासाठी मराठीचा उपयोग केला. आद्य प्राचीन कवयित्री महदईसा यांनी या भूमित धवळे रचले. भाष्कर भट्ट, बोरीकर, नरेंद्र पंडित, विश्वनाथ पंडित, दामोधर पंडित, काशीनाथ व्यास अशा कितीतरी प्रज्ञावंत पंडितांनी या पंथात कथा काव्य निर्माण केलेत. तत्त्वज्ञानाची मराठीतून शास्त्रशुद्ध मांडणी करून कर्मकांड व प्रवृत्तीवादाला नकार दिला व संन्यासवादाचा पुरस्कार केला. मराठी भाषेचा झेंडा पंजाब, अफगाणिस्थानापर्यंत येथूनच पोहोचला.

कौंडिण्यपूर

अमरावतीहून सुमारे 48 किमी अंतरावर, वर्धा नदीकाठी वसलेले हे गाव प्राचीन विदर्भाची राजधानी होती. प्राचीन साहित्यात याची कुंडिनपूर, कुंडिनी, कुंडलपूर, कुंडीन, विदर्भ, विदर्भा वगैरे विविध नावे आढळतात. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडिण्यपूरशी आहे. ही भीष्मक राजाची राजधानी असून त्याची कन्या रुक्मिणी हिचे श्रीकृष्णाने गावाबाहेरील अंबिकेच्या‍ मंदिरातून हरण केले. येथे कार्तिकी एकादशीला मोठी यात्रा भरते. तेथून 400 वर्षांहून अधिक जुनी एक दिंडी आषाढी एकादशीस पंढरपूरला जाते. हे ठिकाण विदर्भनंदन राजाची राजधानी होते. रामाची आजी, अज राजाची पत्नी इंदुमती (राजा दशरथाची आई), अगस्तीची पत्नी लोपामुद्रा तसेच भगीरथमाता सुकेशिनी या सर्वांचे माहेर कौंडिण्यपूर हे होते. नल व दमयंतीचा विवाह हा येथेच झाला. येथील अंबिका मंदिरातून श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले. नदीच्या काठावर एका उंच टेकडावर रुक्मिणीचे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अगदी पारंपरिक मंदिराप्रमाणेच आहे. मंदिरात गाभार्यागच्या आधी मोठे ऐसपैस चौकोनी सभागृह आहे. सभागृहापुढे एक अरुंद असा गाभारा आहे. या गाभार्यामत जगदंबेची काळ्या पाषाणातील सुरेख मूर्ती आहे. असं म्हणतात की हे मंदिर आणि अमरावतीचे एकवीरादेवीचे मंदिर भुयारी मार्गानी जोडलेले आहे. रुक्मिणीचा भाऊ रक्मिने त्याचा मित्र शिशुपालाला रुक्मिणी देण्याचा शब्द दिला होता. पण अचानक कृष्णाने येऊन तो डाव उधळून लावला. त्यामुळे संतापलेल्या शिशुपालाने, 'तुझी राजधानी पालथी होईल' असा शाप दिला आणि कौंडिण्यपूर शहरचे शहर पालथे होऊन गाडले गेले. याचा पुरावा देतांना गावकरी असेही सांगतात, जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ज्या वस्तू सापडल्या त्या सगळ्याच उपड्या घालून ठेवल्यासारख्या होत्या.

गुरुकुंज मोझरी

अमरावतीपासून 34 किमी दूर तिवसा तालुक्यात, राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर (नागपूर अमरावती रस्त्यावर) मोझरी हे गाव आहे. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे. यावली येथे जन्मलेल्या महाराजांनी कर्मभूमी म्हणून दीड हजार लोकसंख्येच्या मोझरी गावाची निवड केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अस्थिविसर्जनाबद्दल क्रांतिकारी विचार व्यक्त करायचे. अस्थिविसर्जनासाठी काशीला अथवा नदीच्या ठिकाणी का जायचे असा प्रश्न विचाराचे. यासाठी पर्याय म्हणून त्यांनी आश्रमात अस्थिकुंड तयार केले. या कुंडामध्ये देशभरातील एकुण ३४ नद्यांचे जल त्यांनी सोडले. अंधश्रद्धा व जातिभेद निर्मूलनासाठी त्यांनी भजन आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी इ.स. 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. वरखेडचे आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत असत. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन 1942 च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीने जिल्हा हादरून गेला असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजिरीवर थाप मारून जिल्ह्यातील तरुणांना राष्ट्रीय आंदोलनास प्रेरित केले. नागपूर विद्यापीठाला 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ' असे नाव दिले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागाच्या पुर्ननिर्माणावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी ‘अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाची’ स्थापना केली व एकीकृत ग्रामीण विकासाकरीता अनेक कार्यक्रम विकसित केले. महाराजांची क्रियाशीलता, आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की त्या वेळेचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ’राष्ट्रसंत’ या उपाधीने सन्मानित केले.

वरखेडचे आडकोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरू आडकोजी महाराज हे होते. चाळीसाव्या वर्षापासून तर ते जणू पूर्ण विदेहीच झाले. वस्त्राचेही भान त्यांना नसे. एवढंच नव्हे तर खाण्यापिण्याचंही भान नसे. त्यांचे भक्त त्यांची काळजी घेत. पण त्यांना आपल्या भक्तांपासून देखील कशाचीच अपेक्षा नसे. त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिका व चमत्कार-कथा प्रचलित आहेत. त्यांनी जे केले ते फक्त लोकहितासाठीच! आडकोजी महाराजांचा जन्म 1823 मध्ये कार्तिक पौर्णिमेस झाला, त्याचप्रमाणं एका शतकानंतर त्यांनी याच दिवशी संजीवन समाधी घेतली.

जहांगीरपूरचा मारुती

अमरावतीहून 43 किमी तिवसा तालुक्यात असलेले श्री क्षेत्र जहांगीरपूर येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनार्थ अनेक भाविक येत असतात.

नांदगाव खंडेश्वर

नांदगाव खंडेश्वर हे अमरावतीहून यवतमाळमार्गावर 36 किमी दूर आहे. येथे 750 वर्षे जूने टेकडीवरील श्री खंडेश्वराचे पुरातन हेमाडपंथी दगडी शिवालय आहे. मंदिरातील कोरीव काम केलेले खांब सर्व अखंड दगडाचे आहेत. तेथे शिवलिंगाशिवाय शिवपार्वती व भगवान नृसिंहाची मूर्ती (हिरन्यकश्यपूचा वध करताना व सोबत प्रल्हाद व त्याची माता) आहे. महाशिवरात्रीला येथे 7 दिवस यात्रा भरते. मंदिरास गाडीने अथवा गावातून पायऱ्या चढून जाता येते. तेथील शिलालेखावरून मंदिर 13व्या शतकात म्हणजे इ.स.1255 साली बांधले गेले आहे. कौण्डिण्य ऋषीचे शिष्य खंडेश्वर यांनी या मंदिराची स्थापना केली म्हणून मंदिराचे नाव खंडेश्वर शिव मंदिर असे पडले.

माधान

सन्त श्री गुलाबराव महाराजांचा जन्म, अमरावतीपासून 47 किमी दूर श्रीक्षेत्र माधान येथे दि.6 जुलै 1881 रोजी झाला. वयाच्या नवव्या महिन्यातच त्यांची बाह्यदृष्टी गेली आणि त्यांना संपूर्ण अंधत्व आले. तरी त्यांनी अंतर्दृष्टीने जगातल्या अनेक विषयांमध्ये वेद-वेदांतापासून संगीत, वैद्यक शास्त्र, साहित्यशास्त्र, तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान, थिऑसॉफी, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान अशा चौफेर विषयावर 134 ग्रंथांची रचना अनेक भाषांमध्ये केली. अवघ्या 34 वर्षांच्या अल्प आयुष्यात त्यांनी सनातन मानव धर्मासाठी जे कार्य केले ते अजोड आहे. वयाच्या नवव्या महिन्यात देवी येऊन डोळे आल्याचे निमित्त होऊन त्यांना कायमचे अंधत्व आले. त्यांच्या ठिकाणी जबरदस्त स्मरणशक्ती व थोर प्रज्ञाशक्ती प्रगट झाली. संत गुलाबराव महाराजाना ‘प्रज्ञाचक्षु’ मधुरद्वैताचार्य असे म्हाणतात. त्यांचा मृत्यु वयाच्या 34 व्या वर्षी 1915 मध्ये झाला. दृष्टी नसंताना सुध्दा त्यांनी 134 पुस्तके वेगवेगळया विषयांवर तेही 6000 पानाची तयार केली. 130 चर्चात्मक पुस्तके आणि 25,000 काव्यांची कडवे लिहिली.

चिखलदरा

अमरावतीहून परतवाडामार्गे 86 किमी, समुद्रसपाटीपासून 3564 फूट उंचीवर, सातपुड्याच्या कुशीत विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखले जाणारे हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी आपला अज्ञातवास चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला. त्यावेळी द्रौपती वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून राहत असे. विराट राजाचा मेहुणा कीचक याची वाईट नजर तिच्यावर पडली. तेव्हा तिने ही गोष्ट भीमाला सांगितल्याने भीमाने किचकाला ठार केले आणि त्याचा मृतदेह वैराटपासून दूर एका दरीत फेकून दिला. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झऱ्यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंड आजही पाहावयास मिळते. हरिकेन पॉईंट, प्रॉस्पेक्ट पॉईंट आणि देवी पॉईंटवरून चिखलदराच्या निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेता येतो. गाविलगड आणि नरनाला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन, आदिवासी संग्रहालय आणि सेमाडोह तलाव ही तेथील प्रेक्षणीय स्थळे होत. गाविलगड किल्ला चिखलदराहून 3 किमी वर आहे. याच्या शेजारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. देवी पॉईंट डोंगराच्या एका भुयारात देवी वसलेली आहे. तेथून चंद्रभागा नदीचा उगम आहे. देवीच्या समोर एक कुंड आहे. कुंडातून पाणी सरळ दरीत उडी घेते. देवीचे दर्शन झाल्यानंतर फेसाळलेला धबधबा मनमोहून टाकतो. देवी पॉइंटहून जवळच मोझरी पॉइंट असून त्याच्या बाजूला हरिकेत पॉइंटही आहे. चिखलदऱ्याच्या जंगलात बरेच प्राणी आहेत. पंचबोल पॉइंट (युको पॉइंट) तर पर्यटकांना चक्रावून टाकणारा आहे. चारही डोंगरांनी वेढलेली ही खोल दरी आहे. येथे मोठ्याने आवाज केल्यास पाच वेळा प्रतिध्वनी ऐकू येतो. विराटराजाचा महाल बघता येतो. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे. येथे कॉफीचे उत्पादन होते. आताशा येथे मध व स्ट्रॉबेरीचेसुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. चिखलदऱ्याजवळ घटांग मार्गावर आमझरी येथे वनविभागातर्फे साहसी-खेळांची व्यवस्था केलेली आहे.

मेळघाट अभयारण्य

अमरावतीहून 109 किमीवर महाराष्ट्राच्या प्रमुख अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक, गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. या अभयारण्याचे पूर्वीचे नाव गाभा क्षेत्र होते. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा असून या रांगांच्या उत्तरेकडे मध्यप्रदेश राज्य आहे. चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जातो व याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात प्रामुख्याने राहते. मेळघाटमध्ये 'सिपना' (सागवान) नदी महत्त्वाची आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे, रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात.

अप्परवर्धा प्रकल्प

मोर्शी तालुक्यातील सिंभोरा गावाजवळ वर्धा नदीवर बांधण्यात आलेले (नल-दमयंती सागर) 39.90 मीटर उंचीचे 15x13 मिटरचे 13 दरवाजे असलेले अमरावती शहराला पाणीपूरवठा करणारे मोठे धरण पर्यटन स्थळ म्हणून ही विकसीत झालेले आहे. अमरावती आणि वर्धा या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर हे धरण आहे. 1993 साली अप्पर वर्धा धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणाच्या यादीमध्ये अप्पर वर्धा या धरणाचा 8 वा क्रमांक लागतो. अप्पर वर्धा हे धरण अमरावती शहरापासून 66 किलोमीटर अंतरावर आहे.

देवनाथ मठ अंजनगाव सुर्जी

अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे गाव अमरावती पासून 81 किमी दूर आहे. येथे इ.स.1803 साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होता. येथे पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष श्री एकनाथ महाराजांच्या परंपरेतील श्री देवनाथ महाराज (ज्यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला) यांनी येथे श्री देवनाथ मठ इ.स.1754 साली स्थापन केला. त्याच परंपरेतील 18 वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ- इ.स. 1960 ते इ.स.2000) यांनी स्वत:च्या कारकिर्दीत हिंदुधर्माची ध्वजा फडकती ठेवली. सर्वश्री नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंभरनाथ, मुरारनाथ, रंगनाथ गोपाळनाथ, गोविंदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरूपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ आणि या क्षणाला पीठाधीश असलेले श्री जितेन्द्रनाथ, ही शिष्यपरंपरा. पैठणच्या संत एकनाथानंतर त्यांचे नाथ परंपरेतील संत देवनाथ यांचा जन्म इ.स.1754 साली सुर्जी येथे दत्त जयंतीचे आधीचे दिवशी झाला. त्यांचे वडील राजेश्वरपंत हे तत्कालीन निजामशाहीत सुर्जी परगण्याचे प्रतिनिधी होते. सुर्जी येथे मठ स्थापनेचे वेळी दिल्लीवर मोघल सम्राटाचे राज्य होते. हैद्राबादेत निजाम होता. म्हैसूरमध्ये हैदरअली व टिपू सुलतान होता. पुण्यात पेशवे, नागपुरात भोसले व अचलपुरात नबाबाचे राज्य होते. आपसातील कलहाचा गैरफायदा घेऊन याचवेळी इंग्रजांनी देशात पश्चिम बंगालमधून प्रवेश केला व येथील राज्यकर्त्यांसोबत तह करुन त्यांनी तैनात असलेल्या फौजेचा प्रयोग याच वेळी सुरू केला. अशा प्रतिकूल परिस्थितीत धर्मरक्षणाचे व धर्मप्रसाराचे महाकठीण कार्य नाथपीठाने जिवंत ठेवले. आपल्या भ्रमंतीत देवनाथ पुणे येथे दरबारी गेले असताना सवाई माधवराव पेशवे यांनी त्यांचे स्वागत करून पूजेत त्यांना पेशवे दरबाराचे दोन तरुण रक्षक त्यांच्या मठाच्या रक्षणासाठी दिले होते. जगू-गणू नाव असलेले हे पराक्रमी रक्षक जातीने महार होते. मठावर लुटारू दरोडेखोरांचे आक्रमण झाले असताना हे वीर मठात शहीद झाले. म्हणूनच आजही देवनाथ मठात कुळाचाराच्या नात्याने जगू-गणूच्या समाधीला पूजेचा अग्रक्रम आहे.

पिंगळादेवी संस्थान नेरपिंगळाई

श्री पिंगळादेवी संस्थान मंदिर हे एक जागृत देवस्थान असून शक्तीपिठ आहे व अनेक लोकांची कुलदेवता आहे. पिंगळा मातेचे मुख्य मंदिर सुमारे 650 ते 700 वर्षापूर्वी बांधलेले ऐतिहासिक व जागृत देवस्थान आहे. अमरावती- मोर्शी मार्गावर अमरावतीपासून 31 किमी अंतरावर गोराळा गाव आहे, येथून दीड किमी अंतरावर टेकडीवर पिंगळाईदेवी चे मंदिर आहे. मंदिराचे सभोवताली बारा शिवाचा पसारा आहे. देवी भागवतानुसार या गडास 'सुंदरगिरी पर्वती' म्हणतात. मंदिरापासून 100 मीटर अंतरावर भोसलेकालीन तलाव आहे. त्याला 'कापूर तलाव' म्हणतात. पिंगळा देवी हे स्वयंभू शक्तीपीठ आहे. प्राचीन हेमाडपंथी शैलीचं बांधकाम असलेलं हे मंदिर 500 ते 600 वर्षापूर्वीचे आहे. मूर्तीचा फक्त चेहरा वर असून पूर्ण शरीर हे जमीनमध्ये आहे. तसेच या मूर्तीच्या खाली विहीर असून या विहिरीतून ही स्वयंभू मूर्ती निघाली असल्याचे म्हटलं जातं. वर्षातून एकदा चैत्र महिन्यात व नवरात्रीत देवीच्या गडावर मोठी यात्रा भरते.

गणोजादेवी संस्थान गणोजा

गणोजा हे गाव भातकुली तालुक्यात अमरावती पासून २४ किमी अंतरावर आहे. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी कोल्हांपूरची श्रीमहालक्ष्मी हे एक पूर्ण पीठ आहे. या देवीच्या मूर्तीची प्रतिरूप मूर्ती गणोजा येथे गणोजादेवी आहे. मूर्तीसाम्यामुळे येथील देवीला करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी म्हणून भाविक संबोधतात. गणोजा येथील मंदिरातील मूर्ती अखंड काळ्या पाषाणाची असून, ती 'स्वयंभू आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला येथे यात्रोत्सव असतो.

आनंदेश्वर मंदिर लासूर

अमरावतीहून 62 किमी व अकोल्याहून 36 किमी अंतरावर असलेले, कळस नसलेले लासूरचे प्राचीन आनंदेश्वर मंदिर फार अद्भूत आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेले या मंदिराच्या आतील बाहेरील छतावरील कोरीव नक्षीकाम हे अजिंठा-वेरूळ लेण्यातील कोरीव कामाशी साधर्म्य सांगणारे आहे. या आनंदेश्वर शिवालयाची उभारणी 12व्या शतकात देवगिरीच्या यादववंशीय राजाच्या काळात झाली. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले लासूरचे आनंदेश्वेर मंदिर अमरावती जिल्ह्याचे सांस्कृतिक वैभव आहे. दर्यापूर तालुका मुख्यालयापासून अकोला मार्गावर 12 किमी अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर लासूर नावाचे एक छोटेसे गाव आहे. हे मंदिर 3500 चौ. फुटांच्या अतिभव्य दगडी बांधकामात आहे. हे मंदिर अष्टकोनी असून समोरच्या भागाकडून एखाद्या भल्यामोठ्या रथाला हत्ती जुंपल्यासारखे दिसते. या मंदिराचा दर्शनी भाग उत्तरेकडे असून दारे व खिडक्या पूर्व-पश्चिम व उत्तर दिशेला आहेत. संपूर्ण मंदिराचे बांधकाम एकावर एक दगडी शिळा रचून नंतर त्यावर कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आतील भागात 12 खुले व भिंतीमधील 6 असे एकूण 18 खांब आहेत. लासूरचे हे मंदिर अतिशय देखणे आणि उत्तरायण काळात दुपारी बाराला सूर्य माथ्यावर असतांना इथे पडणारा प्रकाश व सावल्या पाहताना गणित आणि खगोलचे मिश्रण स्तंभीत करणारे आहे.

Donation