धार्मिक संस्थेच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी 60 वर्षांचा कालखंड तसा फार मोठा आहे. त्यातल्या त्यात धर्मार्थ संस्था ज्या समाजाच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उत्थानासाठी विविध उपक्रमातून समाजाचे उद्बोधन करण्यासाठी नि:स्वार्थपणे कटिबद्ध असतात त्यांचे मार्गक्रमण भौतिक जगातील ऐहिक सुख विलासाकडे वळलेल्या मनोवृत्तीमुळे किती खडतर असेल याची जाणीव सुबुद्ध जनतेला निश्चित असणार, असा विश्वास वाटतो. स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘एखादा भव्य दिव्य भाव मनाशी बाळगून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी घेतल्यास प्रथम आपल्या वाट्यास लोकांची हेटाळणी येईल. याला न जुमानता आपण पुढे गेलात तर आपणास विरोध होईल. व तोही मोडून आपण आपल्या इच्छित ध्येयाप्रत मार्गस्थ राहल्यास शेवटी प्राप्त होईल समाजाची मान्यता ‘‘या दैवी वाणीची प्रचिती श्रीरामकृष्ण विवेकानंद समितीच्या कार्यकर्त्यांना आली यात नवल ते काय? भगवान श्रीरामकृष्ण, माताजी श्रीसारदादेवी व स्वामी विवेकानंद यांच्या वरील अपार श्रद्धेने व त्यांच्याच कृपाशिर्वादाने समितीची वाटचाल अनेक अडीअडचणींवर मात करत ध्येयाप्रत सुरू आहे.
समितीची स्थापना दि.22 एप्रिल 1962 सालची. घटना तयार करतांना तत्कालीन नागपूर मठाचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी भास्करेश्वरानंद महाराजांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरले. समितीचे दैनंदिन प्रार्थनादि कार्यक्रम प्रथम काही काळ श्रीकृष्ण पेठेतील एका लहानशा खोलीत व नंतर काही दिवस जोग दवाखान्यातील छोट्या जागेत श्रद्धावान भक्तांच्या उपस्थितीत भावपूर्ण रीतीने पार पडत समितीचे बीज रोवले गेले. अॅड. सुंदरलाल श्रीवास्तव यांनी अध्यक्ष पदाची धुरा खाद्यांवर घेतली. अमरावती नगरीतील परांजपे वाचनालय दि.12 ऑगस्ट 1962 रोजी समितीच्या स्वाधीन करण्यात आले. त्यातील जवळ जवळ 2500 धार्मिक, आध्यात्मिक व इतर मौल्यवान पुस्तकांची ग्रंथ संपदा घेऊन रेल्वेस्टेशन जवळ एक वाचनालयही सुरू करण्यात आले. आरंभी प्रतिसाद अल्प असूनही भक्तांना कार्यप्रवण करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरला.
इ.स.1968 साली श्री मधुकर सावरे यांच्या प्रयत्नातून समितीला विवेकानंद कॉलनीतील लेआऊट मधील एक प्रशस्त जागा श्री सुधाकर टिकेकर यांचेकडून दान रूपाने प्राप्त झाली. कॉलनीतील गृहनिर्माणासोबतच समितीच्या प्राप्त झालेल्या जागेवर ‘रामकृष्ण मंदिराच्या उभारणीचे कार्य हाती घेण्यात आले. मंदिर प्रकल्पाचा एक आराखडा तयार झाला त्यात साधुनिवास, विद्यार्थीगृह, खालच्या मजल्यावर सभागृह, वरच्या माळ्यावर मंदिराचा गाभारा व प्रार्थनागृह अशा संकल्पना उराशी बाळगण्यात आल्या. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी लागणारी रक्कम एकदम उभी करणे शक्य नव्हते. म्हणून टप्या-टप्याने हा मंदिर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याशिवाय पर्याय नव्हता. तळमजल्या वरील बांधकामाची सुरूवात झाली. सभागृह व पूजागृह तयार झाले. दि.9 फेब्रुवारी 1969 रोजी रामकृष्ण मठ नागपूरचे अध्यक्ष श्रीमत् स्वामी व्योमरूपानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते पूजागृहात प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व समितीला अधिष्ठान प्राप्त झाले. रामकृष्ण मठ नागपूरशी जवळचा संपर्क निर्माण झाला. भक्तवृदांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले. दैनंदिन प्रार्थना, श्रीरामकृष्ण, माताजी सारदादेवी व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवानिमित्त भक्तगण एकत्रित होऊ लागले. विचारवंताची प्रवचने, ग्रंथालयाचे कार्य व इतर कार्यक्रमांच्या आयोजनास सुरूवात झाली.
इ.स.1979 साली समितीचे अध्यक्षपद डॉ. रामकृष्ण जोशी यांनी भूषविले प्रकृती अस्वाथ्यामुळे नंतर ते श्री स.न. उर्फ भाऊसाहेब खेलूरकर यांच्याकडे आले. भाऊसाहेब शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. बुलढाण्याच्या आप्पाजी महाराजांची प्रेरणा त्यांच्यामागे होती. त्यांनी ठाकुरांच्या ह्या कार्यासाठी आपले तन, मन,धन समर्पित केले. सोबत प्रा. श्याम नन्दे समितीचे सचिव त्यांच्या पाठीशी उभे राहिले व समितीला नवजीवन प्राप्त झाले. दैनंदिन प्रार्थने सोबतच ग्रंथालय व वाचनालये कार्य वाढीस लागले. प्रवचनमालेतून अध्यात्मिक उद्बोधनाचे कार्य सुरू झाले. संन्याश्यांचा सत्संग भक्तांना लाभला. स्व.तात्यासाहेब सोमणांनी आजीवन केलेल्या श्रीरामकृष्ण-विवेकानंद-वेदांत साहित्य विक्रीतून केलेल्या भावधारेच्या प्रसाराच्या कार्याला अधिक वेग मिळाला. धर्मार्थ दवाखाना, गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ति मदत या सारखे उपक्रम उत्कटतेने कार्यान्वित झाले. समितीचे समाजोपयोगी अस्तित्व अमरावतीकरानांच नव्हे तर विदर्भातील जनतेला ज्ञाle झाले. कार्याला नवी दिशा मिळाली. श्रद्धेचे अधिष्ठान प्राप्त झाले.
इ.स.1980 साली बेलुर (कलकत्ता) येथे रामकृष्ण सघांतर्फे जागतिक संम्मेलन प्रथमच आयोजित करण्यात आले. या संम्मेलनात 26 देशातील प्रतिनिधी हजर होते. दि.23 ते 29 डिसेंबर 1980 या कालावधीत पार पडलेल्या या संम्मेलनासाठी आमच्या समितीला प्रतिनिधी पाठविण्याचे निमंत्रण म्हणजे समितीने रामकृष्ण विवेकानंद भावधारेच्या प्रसारासाठी केलेल्या निस्पृह कार्याला मिळालेली पावतीच होती. समिती तर्फे 17 स्त्री-पुरूष भक्त प्रतिनिधी म्हणून संम्मेलनात सहभागी झाले. बेलूर मठातील एका आठवड्याचे वास्तव्य आमच्या मनावर भव्य दिव्य भाव बिबंवून गेले. साधुंचा सत्संग, मठातील शिस्त, सेवाभाव, वक्तशीरपणा, कार्यक्रमाचे सुयोजन, भक्तांची ठाकुरांप्रती अपार श्रद्धा, जनतेचे दायित्व, कार्यकर्त्याची निष्कामवृत्ती इ. बाबींचे जवळून दर्शन घडले. त्यातूनच संघर्षमय जीवनात ठामपणे कार्यरत रहाण्याचे नवे सामर्थ्य प्राप्त झाले.
दि.15 जानेवारी 1985 हा दिवस समितीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्या योग्य ठरला. या शुभदिनी, रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन बेलूरचे तत्कालीन उपाध्यक्ष श्रीमत् स्वामी भूतेशानंदजी महाराजांचे आगमन अमरावतीत झाले व समितीची ही वास्तू पावन झाली. दुसर्या् दिवशी या समितीत प्रथम मंत्रदीक्षा समारोह पार पडला व 59 भक्तांना अनुग्रह लाभला. स्वामीजींसोबत आलेल्या रायपूर आश्रमाच्या स्वामी आत्मानंद महाराजांनी परत जाते वेळी मंदिर प्रकल्पाचा संकल्पित आराखडा पूर्ण करण्याचे आवाहन भक्तांना केले. मंदिराच्या वरच्या माळ्यावरील संकल्पित काम पूर्ण झाल्यानंतर प्राण प्रतिष्ठेसाठी पुनश्च येण्याचे अभिवचन दिले. इ.स.1985 साली वरचा गाळा पूर्ण करण्यासाठी अंदाजे खर्च जवळ जवळ 4 लाख रूपये होता. समितीजवळ तर उत्सव साजरे करण्याइतके ही पैसे नव्हते. कार्यकर्ते हवालदिल होत होते. परंतु मंदिर प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू करण्याबाबतचा निर्धार मात्र सुटत नव्हता, प्रयत्नांती परमेश्वर ह्या म्हणीची प्रचिती या प्रसंगातून आली.
इ.स.1986च्या विवेकानंद जयंती उत्सवाच्या दिवशी वरच्या माळ्यावरच्या बांधकामाचा शुभारंभ अमरावती नगरीतील जाधव इंजीनीयरींग कंपनीचे संस्थापक श्री गुलाबराव जाधव यांचे हस्ते झाला व या कामासाठी पहिली दानराशी त्यांचेचकडून प्राप्त झाली. कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नातून जनता जर्नादनाच्या दातृत्वातून निधी जमा होत गेला. ठाकूरांच्या कृपाशिर्वादानेच अनेक निराशाजनक क्षणांतून काम पार पाडले. सुमारे 3 लाख रूपये खर्च करून वरच्या गाभार्याकचे काम पूर्णत्वास नेले. दि. 25 मार्च 1987 रोजी समितीचा रजतजयंती महोत्सव तथा मंदिर समर्पण कार्यक्रम श्रीमत् स्वामी भूतेशानंदजी महाराज यांच्याच शुभ हस्ते पार पाडला. श्रीमत् स्वामी आत्मानंदजी महाराजांनी दिलेल्या आव्हानाला आम्ही उत्तीर्ण झालो व त्यांनी ही आपले वचन पाळले. दि.26 मार्च 1987 रोजी समितीच्या नावाने बांधलेल्या सभा मंडपात द्वितीय मंत्रदीक्षा समारोह पार पडला. उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याचे आव्हान करून स्वामी आत्मानंदजी महाराज परतले.
मंदिर समर्पणाचा भावपूर्ण सोहळा जनतेत नव्या श्रद्धेला जन्म देऊन गेला. समिती ठामपणे आपल्या ध्येयपूर्तीसाठी वाटचाल करावयास लागली. अनेक शैक्षणिक संस्था समितीशी निगडीत झाल्या. अमरावती विद्यापीठ, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, श्री शिवाजी शिक्षण संस्था, महानगर पालिका, गुजराथी शिक्षण संस्था, भारतीय विद्या मंदिर इत्यादि संस्था मदतीचा हात घेऊन नेहमीच सामोरे आल्या. युवकांवर आवश्यक संस्कार करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी ह्या संस्थांचे सहकार्य समितीला अनमोल वाटते. इ.स.1985 पासून 12 जानेवारी हा ‘विवेकानंद जयंती’ चा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून शासनाने घोषित केला. तेव्हापासून अमरावती विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समितीच्या संयुक्त विद्यमाने विवकानंदांच्या तैलचित्राची भव्य शोभा यात्रा सर्व शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होऊन शहरात नवचैतन्य प्राप्त करून देते असा अनुभव आला. अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू या शोभायात्रेचे नेतृत्व करतात व तरूणांना विवेकानंदांनी दर्शविलेल्या मार्गक्रमण करण्याचे आव्हान करतात. युवकांकरिता हे रामकृष्ण मंदिर प्रेरणा स्थान ठरले आहे.
दि. 27 ऑगष्ट 1989 समितीच्या वाटचालीतील अंधकारमय दिवस ठरला. समितीचे प्रेरणा स्त्रोत स्वामी आत्मानंदजी महाराज सचिव रामकृष्ण मिशन विवेकानंद आश्रम रायपूर यांच्या कारला अपघात झाला व त्यातच त्यांचे निर्वाण झाले. काही काळ आम्ही नैराश्याच्या खाईत लोटल्या गेलो. त्यातून आम्ही पुणे मठाच्या स्वामी भौमानंदजी महाराजांमुळे सावरलो. त्यांनी आम्हाला स्वामी आत्मानंदजी महाराजांच्या आव्हानाची आठवण करून दिली. त्यातूनच रामकृष्ण जयंतीच्या मूहूर्तावर दि.16 फेब्रुवारी 1991 रोजी मंदिर प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडला व उर्वरित बांधकामाची सुरूवात श्री सुभाषचंद्र भाकरे, अपर आयुक्त अमरावती विभाग यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
शेवटी विचार येतो की समाज जीवनाच्या निकोप वृद्धीसाठी समाजाचे अध्यात्मिक उत्थान करण्याची निकड आजच्या इतकी या गौरवशाली परंपरा असण्याचा देशात कधी ही भासली नसेल. ह्या समितीसारख्या अनेक सेवाभावी संस्था समाजाचे उद्बोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात. शेवटी हे ठाकुरांचेच कार्य आहे. त्यांचेच आशिर्वाद कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहेत.
महाराष्ट्रामध्ये भावप्रचार परिषदेचे कार्य इ.स.1980 पासून सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रामध्ये रामकृष्ण विवेकानंद भाव प्रचार परिषदेची स्थापना झाली व समिती या परिषदेची सदस्य झाली. तेव्हापासून रामकृष्ण मिशनच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण विवेकानंद भावधारेच्या प्रचार परिषदेचे केंद्र म्हणून समिती विविध कार्य करीत आहे.
दि.24 डिसेंबर 1985 रोजी बेलुर मठ येथे जागतिक युवा संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या युवा संम्मेलनाकरीता विविध देशातून सुमारे 5000 प्रतिनिधी आले होते. त्याकरीता श्रीरामकृष्ण विवेकानंद समिती अमरावती येथील 22 भक्त गेले होते. त्यात सद्यास्थितीत बिलासपूर मठाचे स्वामी सेवाव्रतानंद (जवाहर महाराज) हे देखील होते. ह्या प्रसंगी सर्व सहभागी प्रतिनिधींनी जयरामवाटी व कामारपूकुर ह्या तीर्थस्थळांना देखील भेटी दिल्या.
रामकृष्ण विवेकानंद समिती अमरावतीचे महत्वाचे योगदान म्हणजे येथील सात उच्च शिक्षित तरूणांनी संन्यास दीक्षा घेतली आहे. अजय देशमुख, राजेश साहु, कुलभुषण पडोळे, जवाहर गोहील, देवेंद्र गोहील, शारदा गोहील, आनंद जोशी, स्वप्नील संगेकर हे आपल्या अमरावतीचे सौभाग्यशाली युवक आहेत. हे सातही जण भारतात असणार्याा रामकृष्ण मठांमध्ये श्रीरामकृष्ण विवेकानंद भावधारेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करीत आहेत. समिती स्थित प्रार्थना व ध्यान मंदिरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ दैनंदिन प्रार्थना, श्रीरामकृष्ण देव, माताजी श्रीसारदादेवी व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव आणि अतरंग शिष्यांचे जयंती उत्सव व इतर आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात.
स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंती निमित्त रामकृष्ण मिशनच्या आर्थिक सहयोगाने, रामकृष्ण मठ नागपूर व समितीच्या पुढाकाराने अमरावती येथील पी.आर.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयामध्ये दि.19 फेब्रुवारी 2014 रोजी अमरावती जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील 5 हजार विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय युवा-सम्मेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी रामकृष्ण संघाचे स्वामी ब्रह्मस्थानंद, स्वामी समर्पणानंद, स्वामी बोधमयानंद, स्वामी विमोहानंद, स्वामी निखीलेश्वरानंद आदि संन्यासी उपस्थित होते.
1) स्वामी व्योमरूपानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, नागपूर |
2) स्वामी विश्वेश्वरानंद (अप्पाजी महाराज), रामकृष्ण विवेकानंद केंद्र बुलढाणा |
3) डॉ. लक्ष्मी कुमारी, अध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी |
4) स्वामी त्यागात्मानंद, वेदान्त सोसायटी, बोस्टन अमेरिका |
5) स्वामी ओंकारेश्वरानंद, रामकृष्ण विवेकानंद आश्रम, अकोला |
6) स्वामी निखिलात्मानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ इलाहाबाद |
7) स्वामी ब्रह्मस्थानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, नागपूर |
8) स्वामी स्मरणानंद, जनरल सेक्रेटरी, रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन बेलुर |
9) स्वामी बोधसारानंद, अद्वैत आश्रम, कलकत्ता |
10) स्वामी प्रभानंद, रामकृष्ण मिशन इन्स्टिट्युट ऑफ कल्चर, गोलपार्क, कलकत्ता |
11) स्वामी ब्रह्मेशानंद, संपादक वेदान्त-केसरी इंग्रजी मासिक, रामकृष्ण मठ, चेन्नई |
12) स्वामी सुहितानंद, न्यासी, रामकृष्ण मठ, बेलुर मठ |
13) स्वामी सत्यरूपानंद, रामकृष्ण मिशन विवेकानंद आश्रम, रायपूर |
14) स्वामी ज्योति:स्वरूपानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |
15) प्रव्राजिका सुगतप्राण, सारदा मठ वलसाड |
16) स्वामी शशिकांतानंद, रामकृष्ण मिशन विजयवाडा आंध्रप्रदेश |
17) स्वामी अकामानंद, रामकृष्ण मिशन कनखल हरिद्वार |
18) स्वामी ओंकारात्मानंद, रामकृष्ण मिशन नरेंद्रपूर कलकत्ता |
19) श्रीमती श्रद्धा व्यास, मुंबई |
20) प्रव्राजिका अमितप्राणा, रामकृष्ण सारदा मिशन, कामठी |
21) स्वामी बालगोपालनंद, रामकृष्ण मठ, पुणे |
22) स्वामी सुविद्यानंद, सारदापीठ, बेलूर मठ, हावडा |
23) स्वामी निखिलेश्वरानंद महाराज, रामकृष्ण आश्रम, राजकोट |
24) स्वामी आत्मविकासानंद, रामकृष्ण मठ, पुणे |
25) स्वामी समर्पणानंद, बेलूर मठ |
26) स्वामी बोधमयानंद, रामकृष्ण मठ हैद्राबाद |
27) स्वामी योगात्मानंद वेदान्त सोसायटी, प्रॉव्हीडन्स अमेरिका |
28) स्वामी विष्णुपादानंद , सचिव, रामकृष्ण मिशन, औरंगाबाद |
29) स्वामी गंगाधरानंद, वाराणसी |
30) डॉ. विक्रम सिंह, व्हाईस चान्सेलर, नोएडा इन्टरनॅशनल युनिव्हिर्सिटी |
31) डॉ. अजय पी. देशमुख, डायरेक्टर, बीसीयुई संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ |
32) स्वामी बुद्धानंद, रामकृष्ण मठ, पुणे |
33) स्वामी आर्यानंद, रामकृष्ण मठ, पुणे |
34) स्वामी तन्मयानंद, अम्बिकापूर छत्तीसगड |
35) स्वामी मुक्तिदानंदजी महाराज न्यासी रामकृष्ण मिशन, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, म्हैसूर |
36) स्वामी राघवेन्द्रानंद. सचिव, रामकृष्ण मिशन, ग्वाल्हेर |
37) श्री. कृष्णप्रकाश, आय.पी.एस. पोलिस अधीक्षक, अमरावती |
38) स्वामी प्रभूसेवानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |
39) स्वामी नागेशानंद, रामकृष्ण मिशन बेलूर |
40) स्वामी राधाकांतानंद, रामकृष्ण मिशन आश्रम, नारायणपूर |
41) श्री.प्रशांत पुप्पल, पुणे |
42) स्वामी सुप्रदिप्तानंद, रामकृष्ण मिशन, अरूणाचल प्रदेश |
43) प्रव्राजिका अमितप्राणा, श्रीसारदा मठ इंदौर |
44) स्वामी सेवाव्रतानंद |
45) स्वामी चिद्विलासानंद |
46) प्रव्राजिका सुरतप्राणा |
47) स्वामी तत्वज्ञानानंद, रामकृष्ण मिशन शिल्पमंदिर, सारदापीठ, बेलुर मठ |
48) स्वामी चेतनानंद वेदान्त सोसायटी सेंट ल्युईस अमेरिका |
49) स्वामी अनंतरानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |
50) स्वामी श्रीकांतानंद, अध्यक्ष, रामकृष्ण मठ, पुणे |
51) स्वामी शुध्दिदानंद, अद्वैत आश्रम, कलकत्ता |
52) प्रव्राजिका सुबोधप्राणा, सारदा मठ, कलकत्ता |
53) स्वामी उमेश्वरानंद, रामकृष्ण मिशन, कनखल, हरिद्वार |
54) स्वामी तन्निष्ठानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |
55) स्वामी विपाप्मानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |
56) स्वामी ज्ञानमूर्त्यानंद, रामकृष्ण मठ, नागपूर |